उत्तर प्रदेश टेरर फंडिंग; मास्टर माइंडला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

उत्तर प्रदेशातील गोरखपूर टेरर फंडिंग प्रकरणातील मास्टर माइंड रमेश शहाला पुण्यातील नऱ्हे येथून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी ही कारवाई केली. त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर गोरखपूर येथे नेण्यात आले.

रमेश शहा (वय २८, रा. गोरखपूर, मूळ रा. गोपाळगंज, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहा याने नऱ्हे येथे एक खोली भाड्याने घेऊन तेथे राहात होता. गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या शहाला उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी शोधत होते. त्यांच्या माहितीनुसार पुणे एटीएसलाही माहिती देण्यात आली होती. दरम्यान, शहा हा गेल्या १५ दिवसांपासून पुण्यात नऱ्हे येथे राहात असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. त्यांनी पुणे एटीएसच्या मदतीने मंगळवारी सकाळी शहाला अटक केली.

रमेश शहा याचे गोरखपूर येथे सत्यम शॉपिंग मार्ट नावाचे दुकान आहे. तो त्या माध्यमातून अतिरेक्यांपर्यंत पैसे पुरवित होता. पाकिस्तानी हँडलरच्या सूचनेनुसार शहा हा गुन्हेगारी दहशतवादी कृत्यांची आखणी करीत होता. त्याने कश्मीर, ईशान्येतील राज्य आणि केरळमधून १ कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली आहे. रमेश शहा याला इंटरनेट कॉलवरून पैसे आल्याची माहिती मिळत होती. त्यानंतर तो आणि मुकेश हे दोघे इतरांना साथीदारांना फोन करून पैसे आल्याची माहिती देत होते. हवाला व्यापारी आणि पाकिस्तानचा हँडलर यांना केव्हा पैसे पाठविले जाणार हे फक्त रमेश शहालाच माहिती होती. उत्तर प्रदेश एटीएसला याची माहिती मिळाल्यानंतर काही जणांना अटक केल्यानंतर शहा हा उत्तर प्रदेशातून पळून गेला. तो पुण्यात असल्याची माहिती कानपूर एटीएसला मिळाली. त्यानुसार त्यांनी पुणे एटीएसच्या मदतीने ही कारवाई केली. उत्तर प्रदेश एटीएसने मुकेश प्रसाद, निखिल राय ऊर्फ मुशर्रफ अन्सारी, अंकुर राय ऊर्फ सुशील राय, दयानंद यादव, नसीम अहमद, नईम अरशद या सहाजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये रमेश शहा हाच त्यांचा मोरक्या असल्याचे समोर आले. त्याचे साथीदार मुशर्रफ व मुकेश यांच्याकडील डायरी, बनावट ओळखपत्र, बँकांचे पासबुक, लॅपटॉप जप्त केले आहे.