धक्कादायक! गुदद्वारातून आत गेलेला ग्लास दहा दिवसांनी बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कानपूर

काही दिवसांपूर्वी कानपूरमधील रामा रुग्णालय आणि संशोधन केंद्रात डॉक्टरांना अचंबित करणारी एक घटना घडल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ सर्जन डॉक्टर दिनेश कुमार यांच्याकडे पोटदुखीची तक्रार घेऊन रामदिन नावाचा इसम आला होता. त्याला भयंकर वेदना होत असल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर त्याची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफीत त्याच्या पोटात एक स्टीलचा ग्लास अडकल्याचे बघून डॉक्टरांना धक्काच बसला. दरम्यान, शस्त्रक्रिया करुन त्याच्या पोटातून ग्लास बाहेर काढण्यात आला असून रामदिनची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

glass-in-stomach-1

ग्लास पोटात गेला कसा असे डॉक्टरांनी रामदिनला विचारले असता त्याने दिलेले उत्तर ऐकून सगळे रुग्णालय मात्र हादरले होते. दहा दिवसांपूर्वी रामदिनने ५० हजारात आपली मोटरबाईक विकली होती. त्याचवेळी काही चोरट्यांनी रामदिनला रस्त्यात गाठले व त्याला बेदम मारहाण केली. यात रामदिन बेशुद्ध पडला. नंतर चोरट्यांनी त्याच्या गुद्दवारातून आत पोटात ग्लास घुसवला. त्यानंतर त्याच्याजवळचे पन्नास हजार लंपास केले व तिथून पळ काढला. शुद्धीत आल्यानंतर रामदिन घरी गेला. पण त्याच्या पोटात मात्र दुखत होते. दहाव्या दिवशी रामदिनची पोटदुखी अधिकच वाढली. यामुळे कुटुंबीयांनी त्याला कानपूरमधील रामा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

दरम्यान, एक तासाच्या शस्त्रक्रियेनंतर रामदिनच्या पोटातून ग्लास बाहेर काढण्यात आला. सामान्यत लहान सहान गोष्टी पोटात गेल्याचे आपण पाहतो. पण एवढा मोठा ग्लास पोटात जाण्याची ही देशातील बहुधा पहिलीच घटना असावी असे डॉक्टर दिनेश व त्यांच्या टीमने म्हटले आहे. तसेच ज्या पद्धतीने रामदिनच्या पोटात ग्लास टाकण्यात आला ते पाहता यामागे एखाद्या वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.