वाळकेवाडी नळयोजना प्रकरणी तिन्ही अपहारकर्त्यांवर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिमायतनगर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सार्वजनिक नळयोजनेचे काम अर्धवट ठेवून भारतीय स्टेट बँकेच्या सरसम शाखेत या योजनेसाठी असलेल्या निधीपैकी ३५ लाख १७ हजार ५२८ रुपयांचा वापर न करता अपहार करुन गैरव्यवहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने साहेबराव श्रीराम वाळके यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पुरवठा समितीचे अध्यक्ष रामदास चंपती वाळके (३६), पाणी पुरवठा समितीचे सचिव दिलीप दिगंबर धुमाळे (३६) आणि ठेकेदार व्ही.एम. गोरे या तिघा जणांविरुध्द शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदर्श संसद ग्राममध्ये सामील झालेल्या वाळकेवाडी येथील पाणी समस्या सोडवून नागरीकांची पायपीट थांबविण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून एका कोटी अडुसष्ट लाख हजाराचा निधी सन २०१४-१५ मध्ये मंजूर झाला होता. यावेळी मंजूर निधीतून काम करण्यासाठी स्थानिक पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष रामदास चंपती वाळके (३६) आणि सचिव म्हणून दिलीप दिगंबर धुमाळे (३६) यांची निवड करून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील भारतीय स्टेट बँकेत खाते उघडून रक्कम उचलने व योजनेवर खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले होते. या नळयोजनेचे काम नांदेडच्या राज कॉर्नरजवळील तरोडा बु.परिसरातील कल्याणनगर मधील रहिवाशी असलेले व्ही.एम. गोरे नामक गुतेदारांस देण्यात आले होते. यामध्ये स्टॅड पोस्ट नळयोजना, गावात पाईप लाईन, दोन पाण्याच्या टाक्या करणे अनिवार्य असतांना केवळ एका टाकीचे अर्धवट अवस्थेत तर एका टाकीचा पाया खोदून बेसमेंट तेवढे केले. मात्र नळयोजना पुर्ण करण्याचे सोडून काम झाल्यापेक्षा ३५ लाखाहून अधिकचा निधी पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षांसह सचिवांच्या संगनमताने उचलून संबंधित ठेकेदाराने पळ काढला आहे. या बाबत सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य यासह जागरुक ग्रामस्थांनी गेल्या १४ महिन्यांपासून लढा उभारला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारीही दाखल झाल्या. उपोषणाचे मार्गही अवलंबिण्यात आले.

याबाबत दि. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी फिर्यादी साहेबराव वाळके यांनी हिमायतनगर येथील दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. शासकीय योजनेच्या निधीला हरताळ फासून अपहार करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याप्रकरणी कलम १५६ (३) नुसार पुरवठा समितीचे अध्यक्ष रामदास चंपती वाळके (३६), पाणी पुरवठा समितीचे सचिव दिलीप दिगंबर धुमाळे (३६) आणि ठेकेदार व्ही.एम. गोरे या तिन्ही आरोपींवर निधीपैकी ३५ लाख १७ हजार ५२८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कलम १२० ब, ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ सह ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे सूचित केले होते. या आदेशामुळे पाणी पुरवठ्यातील अपहारकत्र्यावर पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, यामुळे तालुक्यातील रखडलेल्या अन्य ८ ते १० गावातील पाणीपुरवठा योजनेची कामे मार्गी लागतील, अशी रास्त अपेक्षा पाणी टंचाईने हैराण झालेल्या जनतेतून व्यक्त होत आहे.