अबब… वंदे भारत विमानापेक्षाही महाग! मुंबई–गोवा विमानाचे तिकीट 2000, वंदे भारत 2100 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बापू सुळे

कोकणवासीयांसह गोवेकरांना प्रतीक्षा असलेली मुंबई-मडगाव वंदे भारत एक्प्रेस मंगळवारपासून धावणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी रेल्वे उद्घाटनाच्या तयारीला लागली आहे. पण या गाडीचे तिकीट विमानापेक्षाही महाग असल्याची बाब समोर आली आहे. मुंबई-गोवा विमानाचे तिकीट आवघ्या 1900-2000 रुपयांना मिळत आहे. मात्र वंदे भारतच्या एक्झिक्युटिव्ह चेअरसाठी (ईसी) तब्बल 2915 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच विमानाने केवळ दीड-दोन तासांत गोव्यात पोहचता येणार आहे, तर वंदे भारतच्या प्रवासाला सात-आठ तास लागणार आहेत. त्यामुळे देखण्या वंदे भारतचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला चांगलाच भारी पडणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावदरम्यान रेल्वेकडून आठ डब्यांची सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्याचे नियोजन रेल्वेने जूनच्या पहिल्या आठवडय़ातच केले होते. त्यानुसार उद्घाटनाची तयारी झालेली असतानाच ओडिशात भीषण रेल्वे अपघात झाल्याने उद्घाटन तूर्तास पुढे ढकलले होते. त्यानंतर रेल्वे बोर्डाने आता 27 जून रोजी मडगाव-मुंबई अशी उद्घाटन फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांबरोबरच गोव्याला जाणाऱ्यांच्या सेवेत विमान प्रवासाचा फिल देणारी वंदे भारत दाखल होणार आहे. मात्र वंदे भारतच्या चेअर कारचे तिकीट 1435 रुपये तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट दुप्पटीहून अधिक म्हणजे 2915 रुपये आहे. तर मडगाव रेल्वे स्थानकापासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर दाभोलिम विमानतळ असून मुंबई-दाभोलिम दरम्यानच्या विमान प्रवासासाठी 1900 रुपयांपासून 2500 हजार रुपयांपर्यंत तिकीट आकारले जात आहे. तसेच विमान प्रवासाचा वेळही रेल्वेच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतला तळकोकणातील प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळणार आणि त्याना तो परवडणार का हा प्रश्न आहे.

विमानाचे तिकीट (रुपये)

  • इंडिगो 2024
  • अकासा एअर 2077
  • स्पाईस जेट     2154
  • अलाईन्स एअर       2244
  • एअर एशिया   2140
  • विस्तारा 2344

मुंबई-मडगावदरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे चेअर कारचे तिकीट 990 रुपये तर एक्झिक्युटिव्ह कोचचे 2495 रुपये एवढे आहे. याच्या तुलनेत 14 टक्के जादा तिकीट वंदे भारतला आहे.  

सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत ट्रेनने मुंबई-मडगाव या प्रवासासाठी चेअर कारला 1435 रुपये तर एक्झिक्युटिव्ह कारसाठी 2915 रुपये एवढे तिकीट आहे. या गाडीत प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा मिळणर आहेत.
– एल. के. वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे