जमलं हो जमलं! वरुण धवन लवकरच होणार विवाहबद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमध्ये गेले दीड ते दोन वर्षं लग्नसराईचा मोसम जोरात सुरू आहे. अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांच्या विवाहानंतर अर्जुन कपूर या अभिनेत्याच्या विवाहाची चर्चा रंगली होती. पण, सगळ्या शक्यता खोट्या ठरल्या असून अर्जुन नव्हे तर अभिनेता वरुण धवन हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समजत आहे. वरुणचं लग्न त्याची प्रेयसी नताशा दलाल हिच्यासोबत ठरलं आहे.

varun-natasha

यंदाच्या डिसेंबर महिन्यात त्या दोघांचं शुभमंगल होणार आहे. मात्र, अद्याप त्यांच्या विवाहाची तारीख निश्चित झालेली नाही. वरुण गेला काही काळ वरुण आणि नताशा यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. आधी खूप काळ एकमेकांसोबत नात्यात राहिल्यानंतर त्यांनी आपलं नातं सार्वजनिकरित्या मान्य करायला सुरुवात केली होती. कॉफी विथ करणमध्येही नताशासोबतच्या नात्यावर वरुण खुलेपणाने बोलला होता. त्यावेळी त्याने लग्नाबाबतची वाच्यताही केली होती.

वरुण सध्या त्याच्या आगामी कलंक या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा चित्रपट 80 कोटी इतक्या मोठ्या बजेटचा आहे. करण जोहर आणि साजिद नाडियादवाला या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात वरुणसह आलिया भट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर असे तगडे कलाकार दिसणार आहेत. येत्या 17 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.