दिव्यांगांच्या तीन चाकीतून ‘तर्राटांचा माल’

20
liquor Liqueur

सामना ऑनलाईन | वसई

गेल्याच आठवडय़ात वसईत रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक केल्याची घटना घडली असतानाच आता चक्क दिव्यांगांच्या सायकलींचाही यासाठी उपयोग करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पालघरमध्ये दारू तस्करांनी हा नवा फंडा वापरला असून डहाणू उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्यावर झडप टाकत कारवाई केली. यामध्ये मद्याचा मोठा साठा हस्तगत करण्यात आल्याने दारूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

अवैधरीत्या दारू बनविणाऱ्यांविरोधात व दमण बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांविरोधात पालघर जिल्हा पोलीसदलाकडून जोरदार कारवाया सुरू केल्या आहेत. त्यामुळे भांबावलेल्या दारू तस्करांकडून दारू वाहतुकीसाठी नवनवीन पद्धती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. गेल्याच आठवडय़ात वसईत रुग्णवाहिकेमधून दारूची वाहतूक करताना एका टोळीला बेडय़ा ठोकण्यात आल्या. त्यापाठोपाठ आता नवी शक्कल लढवत दिव्यांगांच्या तीन चाकी सायकलचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. पालघर पोलिसांनी दारूची चोरटी तस्करी करणाऱ्या तीन चाकीला ताब्यात घेतले आहे. मात्र ही तीन चाकी रिक्षा अथवा टेम्पो नसून दिव्यांगांची सायकल आहे. या सायकलमधून होणारी दारूची तस्करी पाहून सारेच आवाक झाले आहेत. या घटनेत डहाणू उत्पादन शुल्क विभागाने मोठा दारू साठा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून डहाणू उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करत दारूसाठा जप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या