
वाशीतील होल्डिंग पॉण्डमधील गाळ काढण्याऐवजी महापालिका प्रशासनाने चक्क या होल्डिंग पॉण्डमध्ये मातीचा भराव टाकला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आज या होल्डिंग पॉण्डची पाहणी करून पालिका प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला आहे. होल्डिंग पॉण्डमध्ये मातीचा भराव पडल्यामुळे पॉण्डची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली असून ते शहरासाठी धोकादायक असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
पावसाळ्यात समुद्राला आलेल्या भरतीचे पाणी शहरात शिरून पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नवी मुंबईत विविध ठिकाणी खाडीकिनारी होल्डिंग पॉण्ड निर्माण करण्यात आले आहेत. या पॉण्डमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने त्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी झालेली आहे. वाशी येथील होल्डिंग पॉण्डची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा संघटक रंजना शिंदे, विधानसभा प्रमुख अतुल कुलकर्णी, नगरसेवक विशाल रसाळे, विशाल विचारे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोराळकर, एकनाथ दुंबेरे, मनोज इसवे, सुमित्रा कडू, शत्रुघ्न पाटील, महेश कोठीवाले, उपशहरप्रमुख समीर बागवान, नरेश चाळके, संदीप पवार, उपशहर संघटक अपर्णा दुराफे, विभागप्रमुख प्रकाश ओंबळे, शाखाप्रमुख आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे शिष्टमंडळ होल्डिंग पॉण्डची पाहणी करत असताना पालिकेचा हा कारनामा उघडकीस आला. पालिकेने या ठिकाणी जुने पंप हाऊस तोडून नवीन पंप हाऊस तयार केले आहेत. त्यासाठी होल्डिंग पॉण्डमध्ये टाकण्यात आलेला मातीचा भराव अद्याप काढण्यात आलेला नाही.




























































