वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय महिनाभर बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारने कठोर निर्बंध लादत मनोरंजन मैदानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत हे उद्यान बंद राहणार आहे. मात्र, उद्यानातील नूतनीकरणाची कामे सुरूच राहणार आहेत, अशी माहिती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, 22 मार्च 2020 ला लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर ते 14 फेब्रुवारी 2021 पर्यंत असे 11 महिने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद होते. 15 फेब्रुवारीपासून हे उद्यान पुन्हा सुरू झाले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली.

लॉकडाऊनआधी इतर दिवसांबरोबर शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या 12 हजारांपर्यंत जायची. मात्र, ही संख्याही अडीच ते तीन हजारांवर आली. लॉकडाऊनच्या आधी महिन्याभरात भेट देणाऱया पर्यटकांची संख्या 1 लाख 80 हजार होती. मात्र, ती कमी होऊन 1 लाखापर्यंत आली. उद्यान सुरू झाल्यानंतर 15 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत या महिनाभराच्या कालावधीत 41 लाखांचा महसूल जमा झाला. त्यातच आता पुन्हा वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हे उद्यान बंद करण्यात आले आहे.

पक्ष्यांच्या पिंजऱयांचे काम पूर्ण होणार

उद्यान आणि प्राणिसंग्रहालय एक महिना बंद असले तरी नूतनीकरणाची कामे सुरूच राहणार आहेत. कर्मचारीही नियमितपणे कामावर येत राहणार आहेत. त्यामुळे कोणतेही काम थांबणार नाही. नूतनीकरणादरम्यान, विविध पक्ष्यांच्या पिंजऱयांचे काम महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आणखी जोमाने भरारी घेऊन पर्यटकांसाठी नेहमीप्रमाणेच आकर्षणाचे पेंद्रबिंदू राहणार आहे, अशी माहिती डॉ. त्रिपाठी यांनी दिली.

लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जमावबंदी असल्यामुळे जर लोकांना प्रवेश दिला तर उद्यानात प्रवेश केल्यावर पर्यटक प्राण्यांना पाहण्यासाठी गर्दी करतील. त्यावेळी दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच लोकांना समजावून सांगणेही शक्य होणार नाही. त्यामुळे हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून महिनाभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय