वाहनांची जाळपोळ करणाऱ्या सराईताला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोथरूडमधील सुतारदरा परिसरात वाहनांची जाळपोळ करून फरार झालेल्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी अटक केली आहे.

साहिल हनुमंत हाळंदे (वय 19, रा. सुतारदरा, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध 2016 पासून चोरी, घरफोडी, खूनाचा प्रयत्न, दुखापत, दरोड्याची तयारी, जाळपोळ असे 6 गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेच्या पथक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दरोड्याची तयारी आणि कोथरूडमधील सुतारदरा परिसरातील वाहनांची जाळपोळ करणारा सराईत कोथरूड बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साहिल हाळंदेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने 1 जानेवारी 2021 मध्ये सुतारदरा परिसरातील वाहनांची जाळपोळ केल्याची कबुली दिली. त्याशिवाय डिसेंबर 2020 मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पळ काढल्याचे सांगितले. आरोपी साहिल अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने केली.