
काँग्रेसचे निष्ठावंत पाईक तसेच अभ्यासू नेता अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. शनिवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वरवंटी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कौटुंबिक कार्यक्रमासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे दिल्लीहून लातूरला आले होते. अचानक अशक्तपणा जाणवत असल्यामुळे ‘देवघर’ या त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. आज सकाळी 6.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील, सून अर्चना पाटील तसेच दोन नाती असा परिवार आहे.
































































