
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच सांगली जिह्यातल्या जत तालुक्यातील चाळीस गावांवर कर्नाटकने दावा केला आहे. सीमा प्रश्नाचा वाद ऐरणीवर आलेला असतानाच महाराष्ट्राची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणारे राज्याचे विशेष समुपदेशी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्या व्यस्ततेमुळे ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची राज्याचे विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसाठी राज्याचे विशेष समुपदेशी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण व्यस्ततेमुळे ते सुनावणीच्या वेळी उपलब्ध होण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता माजी महाअधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची राज्याचे विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याशिवाय आणखीन दोन ते तीन वरिष्ठ विधिज्ञांची नावे सुचवण्यात येणार आहेत.




























































