आता राम मंदिर उभारणीसाठी कायदाच करा – विश्व हिंदू परिषद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

राम मंदिरासाठी शिवसेनेने अयोध्येत जाऊन संपूर्ण देशभरात रान उठविल्याच्या पार्श्वभूमीवर आता इतरही हिंदू संघटना राम मंदिरासाठी एकवटल्या आहेत. परभणीतही येत्या 12 डिसेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेतर्फे हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिरासाठी शाासनाने त्वरीत कायदा करावा, अशी मागणीही विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी परभणीत पत्रकार परिषदेत केली. यावेळी प्रांतमंत्री अनंत पांडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद कानडे, अध्यक्ष सुरेंद्र शहाणे, जिल्हामंत्री सुनील रामपुरकर आदींची उपस्थिती होती.

गायकर म्हणाले, राम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, या आशेवर आजवर हिंदू समाज प्रतिक्षा करत आहे. परंतु 29 ऑक्टोबर रोजी हा विषय सर्वोच्च न्यायालयाने आमच्यासाठी प्राथमिकतेचा नाही, असे म्हटले आहे, असे मत म्हणजे, आमच्यासाठी अपमान आहे. प्रत्यक्षात रामजन्मभूमी हा प्रश्न म्हणजे जमिनीचा वाद नाही. पदाचा वाद नाही. ही सन्मानाची लढाई आहे. समस्त हिंदूंच्या भावनेशी निगडीत प्रश्न आहे. मंदिर झाले असून आता केवळ भव्य-दिव्यता बाकी आहे. राम मंदिराचा जटील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. हा प्रश्न चर्चेद्वारे सोडविला जावा, अशी भूमिका घेतल्यानंतरही तोडगा काढल्या जात नाही. संवाद नाकारल्या गेल्यामुळेच 1992 मधील घटना घडली होती. सक्षम पुरावे देऊनही अद्यापपर्यंत निकाल दिला जात नाही. राम मंदिर उभारणीसाठी संसदेत कायदा केला पाहिजे, अशी मागणी यावेळी शंकर गायकर यांनी केली.

न्यायालय देखील हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. 490 वर्षाचा हा संघर्ष सुरू आहे. न्यायालय मात्र दोन मिनिटातच याचिका निकालात काढतात. राम मंदिराशी सर्वसामान्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. केंद्र सरकार या कामी दिरंगाई करत आहे. याबद्दलही खंत व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालय हे आता रक्तपाताची वाट पाहत आहे की काय? असा सवालही गायकर यांनी केला. परभणी येथे बुधवार, 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जिंतूर रोडवरील चौंडेश्वरी मैदान येथे अखिल भारतीय बजरंग दलाचे संयोजक तथा प्रमुख वक्ते सोहन सोळुंकी हे सभेत मार्गदर्शन करणार आहेत. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर गुजरात मधील सोमनाथ मंदिराचे पुनर्रनिर्माण झाले. तोच न्याय अयोध्येच्या राम जन्मभूमीलाही मिळावा. लवकरात लवकर राम मंदिर निर्माण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी लोकजागर करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीत हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शंकर गायकर यांनी यावेळी केले.