Video : माजी भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, खड्ड्यात गाडण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजय कोठोडे । जालना

‘जय जवान, जय किसान’चा नारा देणाऱ्या या देशात शेतकरी कुटुंबावरील अत्याचार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जालन्यातील किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगातील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांना खड्ड्यात गाडण्याचाही प्रयत्न केला.

शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी रावसाहेब भवर निघाले होते. परंतु खांडेभराड यांच्या कुटुंबीयांचा याला विरोध होता. खांडेभराड कुटुंबीयांचा विरोध सहन न झाल्याने भवर यांनी गुंडांकरवी ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच खड्ड्यात टाकून त्यांना गाडण्याचाही प्रयत्न केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्यांवर प्राथमिक उपचारानंतर जालना येथे हलवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर खांडेभराड यांच्या फिर्यादीनंतर टेभूर्णी येथील पोलीस स्थानकात भवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.