
ब्रिजमोहन पाटील । नागपूर
विधानपरिषदेत पुकारलेल्या १६ लक्षवेधी पैकी १० लक्षवेधींचे उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री गैरहजर असल्याने विधानपरिषद १० मिनिटांसाठी तहकूब केल्याने सरकारला याचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. याबाबत संसदीय कामकाज मंत्र्यांनी इतर मंत्र्यांना समज द्यावी, अशी सुचना उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केली. त्यामुळे सरकारला विधानपरिषदेत नामुष्की ओढावली.
विधानपरिषदेत लक्षवेधीसाठी सकाळी विशेष सत्र बोलविण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकार सुभाष देशमुख यांना उत्तर द्यायचे होते. त्यांच्या लक्षवेधी पुकारल्या गेल्या. मुख्यमंत्री सभागृहात थोड्यावेळात येतील तेव्हा यावर चर्चा करू असे उपसभापतींनी सांगितले. शिक्षकांसंदर्भातील लक्षवेधी आल्यावर शिक्षण मंत्री विनोद तावडे हे मुलीच्या प्रवेशासाठी पुण्याला गेले आहेत, त्यामुळे लक्षवेधी पुढे घेऊ असे सांगितले.
उद्योग मंत्री सुभाष देसाई, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, दादा भुसे हे मंत्री उपस्थित होते त्यांची लक्षवेधी घेण्यात आली. तासभर उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री व इतर मंत्री आले नाहीत. उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावर नाराजी व्यक्त करत, लक्षवेधीचे गांभीर्य मंत्र्यांना नाही. आपण १६पैकी १० लक्षवेधी पुढे ढकलल्या आहेत. इतर काम सोडून मंत्र्यांनी सभागृहात आलेच पाहिजे. संसदीय कामकाज मंत्र्यांनी याबाबत मंत्र्यांना समज द्यावी अशी सूचना केली. परंतु यावेळी संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापटही सभागृहात नव्हते. यामुळे विरोधकांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली.
दरम्यान, कालच सभागृहात सचिव नसल्याचे बापट यांनी त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता, त्यानंतर आता मंत्रीही नसल्याने सरकारचा गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे.




























































