
संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विक्रम वसंतराव काळे हे सुरुवातीपासून आघाडीवर असून, भाजपचे उमेदवार किरण पाटील हे तिसर्या स्थानावर आहेत. काळे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
मराठवाडा रिझल्टर्स कंपनीत गुरुवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांच्यासह मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव, भाजपचे किरण पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत एकूण 53 हजार 356 मतदान झाले. त्यात प्रत्यक्षात 50 हजार 771मते ग्राह्य धरण्यात आली. त्यावरून विजायासाठी 25 हजार 386 मतांचा कोटा ठरविण्यात आला.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. त्यांना 20 हजार 78, मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 आणि भाजपचे किरण नारायणराव पाटील यांना 13 हजार 489 मते मिळाली. पहिल्या फेरीत विक्रम काळे यांनी 6 हजार 535 मतांची आघाडी घेतली. 8 व्या फेरीअखेर ही आघाडी 6 हजार 591 वर जाऊन पोहचली. विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार किरण पाटील हे पहिल्या फेरीपासून तिसर्या स्थानावर होते.




























































