गाव तिथं कोविड केअर सेंटर, सोलापूर जिल्ह्याची संकल्पना

कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या सामान्य रूग्णालाही बेड उपलब्ध होत नसल्याचं वास्तव आहे. कोरोनाच्या सामान्य रूग्णांपासून इतरांना बाधा होऊ नये, गावातल्या गावात रूग्णांना उपचार मिळून रूग्ण त्वरित बरा व्हावा, यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभे राहत आहेत. सोलापूर जिल्ह्यात नव्याने 100 कोविड केअर सेंटर उभा राहत असून सद्यस्थितीत या संकल्पनेतून 60 कोविड केअर सेंटर सुरू झाली आहेत.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या संकल्पनेला प्रत्यक्षात आणायला सुरूवात केली आहे. पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर तयार करण्यात येत आहेत. ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं मंगल कार्यालय किंवा शाळांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, खाजगी डॉक्टरांची मदत घेऊन कोविड सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्वामी यांनी जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून संकल्पनेची माहिती दिली. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मंगल कार्यालय, सभागृह हॉल किंवा शाळा निश्चित करून पाहणी करावी. याठिकाणी शौचालय, बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था पहावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विजेची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना दाखल करण्यात येत आहे. रूग्णांना लक्षणे गंभीर असतील, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्या रूग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत आहे.

कोविड सेंटरसाठी आरोग्य कर्मचारी, गावातील खाजगी डॉक्टरांच्या सेवा घेण्यात येत आहेत. त्यांना विनंती करून त्यांच्या सेवेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. रूग्णांना लागणारी औषधे ही जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येत असून इतर साहित्यासाठी गावातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सदस्य यांनी योगदान देण्याचे आवाहन स्वामी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या