पालू हुंबरवणे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार; खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांजा तालुक्यातील पालू हुंबरवणेवाडीत रस्ता नसल्याने ग्रामस्थांना पायपीट करावी लागते.एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला खुर्चीत बसवून दोन बाजूला काठ्यांनी बांधून उपचारासाठी रूग्णालयात आणावे लागते. पालू हुंबरवणेवाडीतील ही अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी पालू हुंबरवणेवाडीला भेट देत पहाणी केली. ग्रामविकास मंत्र्याच्या माध्यमातून हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांना दिले आहे.

विनायक राऊत यांनी लांजा तालुक्यातील ग्रामपंचायत पालु हुंबरवणेवाडीमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत गावातील समस्या जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांसहीत पालु हुंबरवणेवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली.यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याची व पाण्याची प्रमुख समस्या मांडली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी ग्रामविकास मंत्र्यांमार्फत रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीरीसाठी जागा उपलब्ध करुन दिली, की येत्या चार महिन्यांत पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो असा हुंबरवणेवाडीतील ग्रामस्थांना शब्द दिला. तसेच जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभाग मार्फत हुंबरवणेवाडीतील महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी 3 घरघंटी व 2 शिलाई मशिन देण्याच्या सूचना राऊत यांनी सभापतीना दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा सभापती जया माने, लांजा तालुकाप्रमुख संदिप दळवी यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.