दखल -पारधी समाजाची व्यथा-वेदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<नमिता दामले>>

विंचवाचं तेल’ हे पारधी समाजाची कार्यकर्ती सुनीता भोसले यांचं आत्मकथन सहलेखक प्रशांत रूपवते यांनी शब्दबद्ध केले आहे. पारधी समाजात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही जन्मतःच गुन्हेगार हा शिक्का घेऊन येते. याची पाळंमुळं अगदी महाभारत काळापर्यंत खोल रुजलेली आहेत. ब्रिटिश राजवटीतील कायदे; सेटलमेंट कॅम्प, साल्व्हेशन आर्मी इ.च्या दस्तावेजांमध्ये याचे पुरावे सापडतात. ‘विंचवाचं तेल’ थर्ड डिग्रीमध्ये वापरून पोलीस गुन्हेगारांच्या संपूर्ण खच्चीकरणासाठी कोठडीतच व्यवस्था करतात.

सुनीताचा जन्म पारधी समाजातच झाला. त्यामुळे पारध्यांचे भोग तिलाही चुकले नाहीत. भीक मागून जगणे, पालात राहणे, गावोगाव भटकणे आणि परिसरात कोणताही गुन्हा घडला की काहीही शहानिशा न करता कोणत्याही पुराव्याचा आधार नसताना जेलमध्ये जाणे, मारहाण सहन करणे, सतत पोलिसांच्या दहशतीखाली भिऊन जगणे असा या पारध्यांचा जीवनक्रम सुनीताच्या कहाणीतून उलगडत जातो. त्यात भर म्हणजे पारधी समाजातल्या नाना परीच्या अनिष्ट प्रथा, पुरुषांना स्त्र्ायांचा होणारा विटाळ, आपल्याच बांधवांना लुबाडणारी जात पंचायत हे सगळे वाचल्यानंतर प्रगतीशील अशा स्वतंत्र हिंदुस्थानचे हे नागरिक आहेत का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सुनीता वयाच्या अकराव्या वर्षीच चळवळीत उतरली. आंदोलने-मोर्चे, गावोगावी प्रवास, कोर्ट-कचेऱ्या हे सारे करतानाच तिची मानवी हक्क अभियानाशी, बाबासाहेबांच्या विचारसरणीशी ओळख झाली आणि तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आपल्या समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायामुळे तिने लग्न न करता आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी झटत राहण्याचा विचार केला. तिचे अपुरे शिक्षण, बालवयात पितृछत्र हरवणे, दारिद्रय़ हे काहीही आड येऊ न देता, परिस्थितीमुळे खचून न जाता ती काम करत राहिली. लहानपणी या मुलीवर अन्याय करणारी आई पुढे मात्र तिला खंबीर साथ देत राहिली. राजेंद्र काळे, बाळू जाधव, आबा वाघमारे, राजू काळे यांचे सुनीताताईंविषयीचे मनोगत खूप बोलके आणि इतिहास सांधणारे, परिशिष्ट विषयाची धग वाढवणारे आहेत. सुनीताताईंचे हे आत्मकथन पारध्यांची व्यथा-वेदना जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवे.

विंचवाचं तेल
लेखिका-सुनीता भोसले
प्रकाशक-रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठs-198, मूल्य-रुपये 250/-