पालिका मुख्यालय, विभाग कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदीप पगडे

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधी, नियमित येणारे अधिकारी, कर्मचारी यांना वगळून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात तसेच 24 विभाग कार्यालयांत आणि खात्यांमध्ये येणाऱया नागरिकांना (व्हिजिटर्संना) येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लादल्यानंतर आता पालिकेने मुख्यालय, 24 विभाग कार्यालये आणि खात्यांमध्ये कामासाठी येणाऱया आगंतुकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तातडीची कामे असतील तर त्यासाठी ऑनलाइनचा पर्याय देण्यात आला आहे. कोरोना चाचणी करून 48 तास झालेल्या आणि निगेटिव्ह अहवाल दाखवून आगंतुकाला अपवादात्मक परिस्थितीत प्रवेश देण्यात येणार आहे. कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी वगळून बाहेरचे इतर कर्मचारी, अधिकारी यांच्याशी बैठका ऑनलाइन घेण्यात याव्यात, मुख्यालये तसेच विभाग कार्यालयातील टपाल कार्यालयाच्या बाहेर स्वीकारण्याची व्यवस्था केली जावी तसेच सर्व कर्मचाऱयांनी लवकरात लवकर लसीकरण करावे, असे परिपत्रक मुंबई महापालिकेने आज जारी केले.