श्री विठ्ठलाचे ते दागिने वितळवण्यास परवानगी द्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला दान स्वरूपात आलेले आणि हाताळण्यास अयोग्य असलेले सुमारे 28 किलो सोन्याचे दागिने वितळवून त्यापासून देवाला दागिने आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे परवानगी मागितल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या स्थापनेपासून 1985 सालापासून आजवर देवाला भक्तांकडून जवळपास 28 किलो सोन्याचे आणि 996 किलो चांदीचे हजारो लहान-सहान स्वरूपातील विविध दागिने जमा झाले आहेत. सुमारे 35 वर्षे होऊन गेल्याने यातील बहुतांश दागिने हाताळण्यास जिकिरीचे झाले आहे. त्यांची देखभाल आणि मोजदाद, मूल्यांकन करणेसुद्धा कठीण झालेले आहे. या दागिन्यांची संख्या हजारात असल्याने समितीला हे सोने-चांदीचे लहान लहान दागिने पोत्यात भरून ठेवण्याची वेळ आली आहे.

मंदिरे समितीचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी हे दागिने देवाचे पारंपरिक, पेहेरावातील नाहीत, त्यामुळे ते वितळवून त्याच्या सोन्या, चांदीच्या विटा किंवा वस्तू बनवण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागास 2018 साली पाठवला होता. मात्र, त्यावर काहीही निर्णय झाला नव्हता. आज झालेल्या मंदिरे समितीच्या बैठकीत या दागिन्यांचे नवे अलंकार बनविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

याबाबत समितीने पुन्हा विधी व न्याय विभागाकडे याबाबत विचारणा करणारे पत्र दिले असून, यापूर्वी या सोने-चांदीच्या दागिन्यांच्या विटा बनविण्याचा निर्णय समितीने घेतला होता. मात्र, कोरोनाकाळामुळे शासनाचा प्रतिनिधी न मिळाल्याने हे सोने-चांदी वितळविण्याचा निर्णय प्रलंबित ठेवावा लागला होता. आता मंदिरे समिती याप्रश्नी गंभीर झाल्याने शासनाकडे या सोने-चांदी वितळविण्याबाबत तातडीने निर्णय देण्यासाठी पत्र दिले आहे. अशाप्रकारे सोने वितळविण्यासाठी मंदिरे समितीचा एक प्रतिनिधी, विधी व न्याय विभागाचा एक प्रतिनिधी आणि रिझर्व्ह बँकेचा एक प्रतिनिधी यांच्यासमोर ‘इन कॅमेरा’ हे सोने-चांदी वितळविण्याचा शासनाचा निर्णय असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. आता शासनाने निर्णय दिल्यानंतर याबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.