
सामना प्रतिनिधी, मुंबई
वडाळ्यात जमीन खचून वाहने गाडली गेल्याची दुर्घटना उत्खननामुळे झाली नसल्याचा निष्कर्ष आयआयटी तज्ञ समितीच्या प्राथमिक अहवालात काढण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी काम सुरू असलेल्या ‘दोस्ती’ रिऑलिटीला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुर्घटनास्थळाच्या परिसरातील इमारतींवर सुरक्षेसाठी बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचा सल्लाही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
वडाळ्यात २५ जून रोजी दोस्ती संकुलातील लॉइड इस्टेट इमारतीची संरक्षक भिंत खचल्याने तब्बल १५ वाहने जमिनीखाली गाडली गेली. यावेळी जीवितहानी झाली नसली तरी लागूनच असलेल्या इमारतींच्या भिंतीला तडे गेले. त्यामुळे त्या ठिकाणच्या रहिवाशांना घरे रिकामी करावी लागली. या ठिकाणी काम सुरू असलेल्या दोस्ती पार्क इमारतीसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाने आयआयटीच्या दोन सदस्यांची नियुक्ती केली होती. या समितीने आपला प्राथमिक अहवाल पालिकेला सादर केला असून यामध्ये दुर्घटनेला उत्खनन जबाबदार नसल्याचे समजते.
सुरक्षेची काळजी घ्या
संबंधित समितीने खड्डा पडलेला भाग भराव टाकून भरून घ्यावा असे सूचनाही समितीने केल्या आहेत. याशिवाय या ठिकाणी तूर्तास पार्किंग करू नये. सुरक्षेसाठी या ठिकाणी बॅरिकेडस् लावावेत, बांधकामाला स्टीलचा आधार द्यावा याबरोबरच यासंदर्भात आणखी तपासणीची आवश्यकताही समितीने सुचवली आहे.
अहवाल काय सांगतो
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयआयटीच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्रा. बी. व्ही. एस. विश्वनाधम व प्रा. डॉ. जनगीड यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. यांच्यामार्फत घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून, रहिवाशांबरोबर चर्चा करून अहवाल तयार करण्यात आला. यानंतर खोदकामामुळे दुर्घटना घडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. खोदकाम केले होते तरी पाया मजबूत होता. त्यामुळे संरचनात्मक सुरक्षेला धोका पोहोचल्याचे आढळून नसल्याचे समितीने स्पष्ट केले.
गेल्या वर्षीही या ठिकाणी भिंत कोसळल्याची घटना घडल्यानंतर १७ जुलै २०१७ रोजी नेमलेल्या स्ट्रक्चरल इंजिनीयरने खोदकामामुळे घडल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र आता नेमलेल्या समितीच्या सदस्यांनी तपासणीप्रसंगी इंजिनीअरकडे केलेल्या चौकशीत १४८ पैकी फक्त तीन कॉलमला तडे गेल्याचे सांगण्यात आले, मात्र हे कारण दुर्घटनेला कारणीभूत असल्याचे समितीने मान्य केले नाही.





























































