
कोणतीही चूक नसताना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी केलेल्या मारहाणीविरुद्ध दाद मागणारे वडाळय़ातील दत्तात्रय निमजे हे ज्येष्ठ नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. निमजे यांना झालेल्या मनस्तापाबद्दल त्यांना 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी तसेच भरपाईची रक्कम मिळेपर्यंत दरमहा साडेबारा टक्के दराने व्याज देण्याचे स्पष्ट आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने गृह विभागाला दिले होते, मात्र गृह विभागाने त्यांना केवळ नुकसानभरपाईची रक्कम दिली आहे. व्याजाची रक्कम मिळवण्यासाठी निमजे यांचा शासन दरबारी अजूनही संघर्ष सुरूच आहे.
दत्तात्रय निमजे हे वडाळा येथील भक्ती पार्क संकुलात राहतात. सोसायटीतील रहिवाशांकडून त्यांना शिवीगाळ झाली होती. त्याविरोधात तक्रार देण्यासाठी ते पोलीस ठाण्याला गेले असता पोलिसांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली. मे 2018 मध्ये राज्य मानवी हक्क आयोगाने निमजे यांना व्याजासह नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. परंतु गृह विभागाच्या सचिवांनी हे आदेश धुडकावत नोव्हेंबर 2018 मध्ये निमजे यांना केवळ 25 हजार रुपये दिले. निमजे यांनी ते पैसे गृह विभागाला परत करून फेब्रुवारी 2019 मध्ये सरकारविरुद्ध रिट याचिका दाखल केली. त्यानंतर गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी त्यांना 5 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली, मात्र, 5 मे 2018 ते 19 मार्च 2021 या 36 महिन्यांची व्याजाची सुमारे 2 लाख 10 हजारांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. ही रक्कम मिळवण्यासाठी निमजे यांना शासनदरबारी खेटा माराव्या लागत आहेत. ‘व्याजाची रक्कम मिळणे हा माझा हक्क आहे. माझ्यापासून वंचित ठेवण्यात आलेली मदत मला देण्यात यावी आणि दोषींवर कारवाई व्हावी’, अशी मागणी निमजे यांनी केली आहे.






























































