
सामना प्रतिनिधी । मुंबई
आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) संचालक आणि नाटककार, दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. येत्या 22 आणि 23 डिसेंबर रोजी गोंदिया येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. दोन दिवसांच्या या संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा यांनी दिली आहे.
शिक्षकांमधील साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे संमेलन सुरु झाले आहे. गोंदिया येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनात दिवसभर कवी संमेलन, टॉक शो, व्याख्याने, झाडीपट्टीतील नाटके असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे, असे शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगितले.


























































