
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री जाहीर केलेल्या विविध उपाययोजनांचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून समर्थन केले. कोरोनाविरोधातील युद्ध लॉकडाऊननेच जिंकता येईल. सर्वकाही बंद केले पाहिजे, शहरांच्या सीमा सील केल्या पाहिजेत, असे ट्विट चिदंबरम यांनी केले.
कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर आर्थिक आणि सामाजिक पावले उचललीच पाहिजेत. त्यांनी कठोर भूमिका घ्यावी, वेळ वाया घालवू नये, असा सल्लाही चिदंबरम यांनी पंतप्रधानांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांचे मी समर्थन केले. परंतु कठोर सामाजिक आणि आर्थिक पावले उचलण्याशिवाय पंतप्रधानांकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल, असे ट्विट चिदंबरम यांनी केले.




























































