
सामना ऑनलाईन । लखनौ
शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद वसीम रिजवी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांच्याबाबत वादग्रस्त केले आहे. प्रियंका गांधी सुंदर आहेत, त्यांना राजकारणामध्ये येण्याची आवश्यकता नव्हती. त्या जर आधी आल्या असत्या तर आम्ही त्यांना चित्रपटामध्ये जफर खानच्या सुनेची भूमिका दिली असते, असे रिजवी म्हणाले.
सैय्यद वसीम रिजवी यांनी अयोध्येमध्ये पत्रकारांशी बोलताना आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कुटुंब मुसलमान आहे. काँग्रेसचे लोक भगवान श्रीरामाचे अस्तित्व मानत नाहीत, असे वक्तव्य सैय्यद वसीम रिजवी यांनी केले आहे. तसेच अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणार असा उल्लेखही रिजवी यांनी यावेळी केला. पुढील वेळी अयोध्येमध्ये मंदिरात दर्शन घेण्यासाठीच येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रामजन्मभूमिवर आधारित चित्रपटाबाबत बोलताना रिजवी म्हणाले की, समाजवादी पक्षाचे गुंड चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाहीये. डिसेंबरमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु सपाच्या गुंडांनी हे प्रकरण न्यायालयात नेते आणि प्रदर्शनामध्ये अडथळे निर्माण केले. आता हा चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित होईल, असेही ते यावेळी म्हणाले.





















































