रानसई धरण आटले, सिडकोने 10 एमएलडी पाणी देण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

उरण तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण आटले असून फक्त 10 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून उरणकरांना सध्या मृत (राखीव) साठ्यातून पाणी पुरवठा सूरू आहे. त्यामुळे उरण करांना आठवड्यातून दिन दिवस पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी पावसाने लवकर काढता पाय घेतल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात कमी आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत 24 दिवसांचा पाणीसाठा कमी झाला. उरण तालुक्याला रोज 10 एमलडी पाण्याची गरज लागते. त्यापैकी 3 एमएलडी पाणी रानसई धरणातून घेतले जाते तर रोज 7 एमएलडी पाणी सिडको कडून विकत घेऊन उरण करांची गरज भागवली जाते.

उरण तालुक्याला आणि येथे असलेल्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी 1970 च्या दशकात हे धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत हे धरण बांधले आहे. सुमारे 6.8 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्यूबिक मिटर पाणीसाठविण्याची क्षमता आहे. मात्र गेल्या वर्षी पाऊस लवकर गेल्याने धरणाच्या पाणीसाठा कमी झाला. सध्या या धरणात ता.04 एप्रिल अखेर 1 एमसीएम पेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे. येत्या 5-6 दिवसात पाऊस झाला नाही तर रानसई धरणातील सर्व पाणी संपणार आहे आणि पाणी टंचाई भासणार आहे. त्यामुळे ही पाण्याची उणीव भरून काढण्यासाठी सिडकोने 10 एमएलडी पाणी उरण करांसाठी द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

या रानसई धरणातून उरण तालुक्यातील 24 ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि ओएजीसी, बीपीसीएल सारख्या इतर मोठ्या प्रकल्पांना पाणी पुरवठा केला जातो. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्याप्रमाणात औद्योगीक विकास झाल्याने येथे येणाऱ्या या प्रकल्पांना या धरणातूनच पाणी पुरवठा केला जात आहे. या धरणातून दररोज सुमारे 35 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सिडकोकडून 10 एमएलडी पाण्याची मागणी केली होती मात्र सिडको सध्या रोज 7 एमएलडी पाणी देत असून उरणच्या लोकांची गरज भागविण्यासाठी हे पाणी पुरेसे असून रानसई धरण आणि सिडकोचे पाणी मिश्र करून उरण करांना देण्यात येत आहे. साधारण 14 जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी रानसई धरणात शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उरणच्या नागरीकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन केले आहे. आणि सिडकोने आणखी 3 एमएलडी पाणी द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जर सिडकोने हे पाणी दिले नाही तर उरणकरांना आठवड्यातून तिन दिवस पाणी कपात करावी लागेल.