14 वर्षांपासून जलशुद्धीकरण केंद्र बंद, रायतेकरांचे आरोग्य धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मोहने

पाणीपुरवठा करणाऱया पाइपलाइनला अनेक ठिकाणी लागलेली गळती आणि 2005 पासून बंद झालेल्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला आता फक्त दूषितच नाही तर जंतू असलेल्या पाण्याचा पुरवठा होत आहे. रायते गावात अनेक घरातील नळांमधून जंतू येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कल्याण तालुक्यातील 12 गावे आणि चार पाडय़ांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या भागाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन जुनी झाली असून अनेक ठिकाणी फुटलेली आहे. त्यामुळे सांडपाणी या पाण्यात मिसळत असल्याने ग्रामीण भागाला अनेक वेळा दूषित पाण्याचा पुरवठा झाला आहे. या गावांसाठी असलेले जलशुद्धीकरण केंद्र 2005 पासून बंद आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या गलथान कारभारामुळे रायते गावातील ग्रामस्थांना आता जंतूमिश्रीत पाणी प्यावे लागत आहे.

गावकऱयांचा आंदोलनाचा इशारा
नळाच्या पाण्यातून जंतू आले असल्याचा आरोप बेबी कोर, अरुणा तारमळे, पमा वरकुटे, यशोदा तारमळे, गीता सुरोशी, शारदा सुरोशी, द्वारका रोहणे, विमल हरड, मनीषा तारमळे आदी महिलांनी केला आहे. दरम्यान, रायते गावासाठी पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन बदलण्यात आली नाही तर तीक्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच पद्मश्री जाधव यांनी दिला आहे.