
सामना ऑनलाईन । येवला
पालखेड डाव्या कालव्यातून सोमवारी सायंकाळी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येवला व मनमाडच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी दिले जाणार आहे. मात्र हे पाणी सिंचनासाठी मिळणार की नाही याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
सोमवारी सायंकाळी चार वाजता धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. 350 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून मनमाड शहर, मनमाड रेल्वे, येवला शहर व 38 गाव पाणीपुरवठा योजनांच्या तलावासाठी हे पाणी सध्या सोडण्याचे आदेश झालेले आहेत. या पाण्यात सिंचनाच्या पाण्याचा समावेशनसून यावर उद्या चित्र कळणार आहे. पालखेड डाव्या कालव्यात सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सिंचनाचे पाणी देण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु सिंचनाचे आवर्तन या आवर्तनासोबत दिले जाणार असून किती पाणी सिंचनासाठी मिळेल हे लवकरच कळणार आहे.
दरम्यान, दिंडोरी तालुक्यातून सुटणारे पाणी नाशिक, निफाड या तालुक्यांतून पुढे येवला व मनमाडपर्यंत येत आहे. या पाण्याची चोरी केली जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. कालव्यात जमिनीखाली डोंगळे टाकून तसेच पाइपलाइनच्या माध्यमातून चार ते पाच किलोमीटरपर्यंत पंपाच्या साहाय्याने पाणी नेले जाते. त्यामुळे पाणी सोडतेवेळी कालव्याच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीचोरी रोखण्यासाठी पोलिसांची गस्त ठेवणे, डोंगळे काढणे आदी उपक्रम हाती घेतले आहे. तरीही पाणीचोरीची भीती असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.





























































