अहिल्यानगरात पाणीटंचाई; 111 गावे बाधित, 107 टँकर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाचा तडाखा आणि भूजलपातळीत दिवसेंदिवस होत असलेली घट यामुळे जिह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली आहे. शेवगाव व जामखेड या दोन तालुक्यांनादेखील पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच शेवगाव आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत टँकर सुरू झाले आहेत. दरम्यान, जिल्हाभरात आजमितीस 111 गावे आणि 650 वाडय़ांत पाणीटंचाई असून, येथील 1 लाख 99 हजार 435 लोकसंख्येला 107 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपर्यंत अकोले, संगमनेर, अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी व कर्जत, नेवासा या सात तालुक्यांतील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसल्याने या गावांतील जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आता शेवगाव तालुक्यातील 4 गावे आणि 14 वाडय़ांत पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रांताधिकाऱयांनी चार टँकर सुरू केले आहेत. जामखेड तालुक्यातील 3 गावे आणि 3 वाडय़ांतील साडेसात हजार लोकसंख्येसाठी 4 टँकर धावत आहेत.

सध्या पारनेर तालुक्यात टंचाई परिस्थिती अधिक असून, या तालुक्यात 36 टँकर सुरू आहेत. संगमनेर तालुक्यात 20, नगर तालुक्यात 15, पाथर्डी 13, कर्जत 11, शेवगाव व जामखेड तालुक्यांत प्रत्येकी 4, अकोले तालुक्यात 3, तर नेवासा तालुक्यात एक टँकर सुरू आहे.