शिरूरच्या पश्चिम भागातील ९ गावांतील पाणी प्रश्न पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील ९ गावातील पाणी प्रश्न गंभीर झाला असून आता या भागातील नागरिक संघटितपणे पाणी मिळण्यासाठी एकवटले आहेत. दि. १४ रोजी तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे राष्ट्रावादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर पुंडे यांच्या नेतृत्वाखाली या दहा गावातील नागरिकांची पाणी प्रश्ना संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी न्हूरमेसाई, रेनगर, खैरवाडी, मोराचीचिंचोली, शास्ताबाद, मिडगुलवाडी, घोलपवाडी, गारकोलवाडी, फलकेवाडी, ढगेवाडी व इतर गावातील मान्यवर नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भागात या वर्षीचा संपूर्ण पावसाळा कोरडा गेला. आहे ते पाण्याचे श्रोत आटले आहेत. तळे, नाले ठणठणीत कोरडे पडलेत, पावसाअभावी शेतातील पिके करपली आहेत. नागरिकांना आतापासूनच टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. जनावरे चारा व पाण्यापासून वंचित होऊ लागली आहेत. तर आता ऐन हिवाळ्याच्या तोंडावर पाणीच नसल्याने आता करायचे काय असा मोठा प्रश्न या भागातील नागरिकांमध्ये उभा राहिला आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याअभावी जगायचे कसे, असा बिकट प्रश्न नागरिकांपुढे पडला आहे. आजपर्यंत या गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे लोकप्रतिनिधीकडून वेळोवेळी नागरिकांना आश्वासन दिले गेले. पण या महत्वपूर्ण प्रश्नी नागरिकांना निवडणुकांनंतर केवळ आश्वासनरुपी वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतर ही आजतागायत या भागातील पाणी प्रश्न कायमच आहे. या वर्षी पाऊसाने बहुसंख्य ठिकाणी पाठ फिरवली तशीच शिरूर तालुक्यात ही पावसाची परस्थिती बिकटच आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडून डिंबा उजवा कालवा व चासकमान कालवा व घोडनदीमुळे काही गावात पाण्याची परिस्थिती बरी आहे. पण पठारी भागात असणाऱ्या कान्हूर मेसाई, मोराची चिंचोली, खैरेनगर व इतर भागात आताच पाणी टंचाईचे संकट अत्यंत बिकट झाले आहे. शासनस्तरावर तातडीने या दुष्काळाची तीव्र झळ बसत असलेल्या गावांसाठी चासकमानच्या डाव्या कालव्यातून किमान माणसे व जनावरे जगविण्यासाठी पाईपलाईन द्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली आहे.

या ९ गावातील पाणी संकट तीव्र होत असताना या प्रश्नी नागरिकांची एकजूट झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून या महत्वपूर्ण प्रश्नी सर्वांनी एकत्रितपणे संघटीत होत न्याय लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करीत पाण्याचे राजकारण न करता हा लढा देण्याचा एल्गार केला आहे. जर हा प्रश्न शासन स्तरावर तातडीने मार्गी लागला नाही तर वरील गावातील नागरिकांनी संघटीतपणे याबाबत आवाज उठविण्याच्या तयारीत आहेत. तर आगामी निवडणुकीवर व मतदानावर बहिष्कार घालण्याचा मानस देखील काही संतप्त शेतकऱ्यानी व्यक्त केला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, राष्ट्रावादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर पुंडे, मोराची चिंचोलीचे माजी सरपंच निवृत्ती नाणेकर, खैरेनगरचे माजी सरपंच रघुनाथ शिंदे, कान्हूर मेसाईचे माजी सरपंच बापूसाहेब ननवरे, सरपंच दादा खर्डे, खैरेवाडीचे माजी सरपंच रामदास मांडले व अनेक शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.