विहिरींमध्ये खडखडाट, मोखाड्यातील 75 गावे निघाली पाणी शोधायला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मोखाडा

या वर्षी पावसाने सप्टेंबरमध्येच काढता पाय घेतल्याने भीषण पाणीटंचाईचे चटके नोव्हेंबर महिन्यातच बसू लागले आहेत. मोखाडा तालुक्यातील विहिरींमध्ये खडखडाट होऊ लागला असून तळे, ओढेही सुकायला लागले आहेत. याचा मोठा फटका तालुक्यातील 75 गावांना बसू लागला आहे. येथील गावकऱ्यांची हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती सुरू झाली आहे. खड्ड्यांतून पाणी काढण्यासाठी आतापासूनच रांगा लागल्या आहेत.

दरवर्षी साधारण 3000 मिलिमीटर पाऊस पडतो, परंतु या वर्षी सरासरी केवळ 2300 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे 700 मिलिमीटर पाऊस कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस पाणीटंचाईला सुरुवात झाली होती. मात्र या वर्षी तीन ते चार महिने आधीच पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. मोखाड्यातील 24 गावे आणि 51 पाडे असे एकूण 75 गावे, पाडे पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली आहेत. पंचायत समितीनेही याला दुजोरा दिला असून तसा निवारण आराखडा सरकारला सादर केला आहे, परंतु हा आराखडा सरकारदरबारी पोहोचण्याआधीच येथील गावकरी पाण्याच्या शोधासाठी मैलोन्मैल पायपीट करीत आहे.

दुष्काळग्रस्त गावांची सेंच्युरी होणार
यंदा 700 मिलिमीटर पाऊस पडूनही पंचायत समितीने फक्त 75 गावपाऱ्यांत पाणीटंचाई असेल, असा रिपोर्ट देऊन सारे काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त गावपाडे सेंच्युरी पार करतील, अशी स्थिती आहे.

अजून कोणत्याही गावपाड्यातून टँकरची मागणी आलेली नाही. डिसेंबर महिन्यात ती येईल अशी शक्यता आहे.
– बी.एम. केतकर, तहसीलदार, मोखाडा.

पाणीटंचाईबाबत 3 डिसेंबरला ग्रामसेवकांची बैठक बोलावू आणि त्यात पाणीटंचाईबाबत गावपाड्यांची नव्याने माहिती घेऊ.
– संगीता भांगरे, गटविकास अधिकारी, मोखाडा.