
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड शहरातील तीव्र पाणीटंचाईची समस्या पाहता जामखेड तालुका शिवसेनेतर्फे मोफत पाणीवाटपासाठी टँकर सुरू करून शहरातील जनतेला दिलासा दिला आहे. सध्या जामखेड शहरात पंचवीस दिवसांतून एकदा एक तास नळाला पाणी येत आहे. शहरात पाणी पुरवठ्यासाठी शासकीय 38 टँकरच्या 76 खेपा होतात. परंतु टँकर व शहरातील पाणीपुरवठा याचा ताळमेळ बसत नाही. अनेक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात टँकर सुरू केले आहेत. तरीही नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टँकरद्वारे मिळणारे पाणी पिण्यायोग्य नसते चार दिवसातच पाण्याचा वास येतो व पाण्यात अळ्या दिसतात. या सर्व गोष्टीचा विचार करून शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद व इतर शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरातील नागरिकांची सोय व्हावी व नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी टँकरद्वारे पुरवले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे.


























































