
सामना प्रतिनीधी । मुंबई
प्लॅस्टिकच्या पिशव्या सर्रास वापरण्याची सवय असल्यामुळे बंदीच्या अंमलबजावणीनंतर सुरुवातीच्या काळात थोडा त्रास नक्कीच होईल, मात्र यामुळे पुढच्या पिढीचे भविष्य सुधारेल. महाराष्ट्राचा प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जगाला आदर्श ठरेल असा ठाम विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी २९ ऑगस्टच्या अतिवृष्टीत मुंबईची पाहणी करताना प्लॅस्टिकमुळेच मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याचे लक्षात आले. शिवाय प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरामुळे मोठय़ा प्रमाणात समुद्रप्रदूषण होत आहे. जलनिस्सारण वाहिन्या, सहा पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी उपसण्याचे काम केले जाते, मात्र गटारांत अडकलेल्या प्लॅस्टिकमुळे पाणी जाण्यास मोठा अडथळा येतो. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीसाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. प्लॅस्टिकबंदी एका रात्रीत आली नाही तर महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, सहाय्यक आयुक्त (विशेष) निधी चौधरी, अभिनेत्री दिया मिर्झा, जुही चावला, वर्सोवा बीच क्लीन करणारा अफरोज शहा यांच्या समन्वयामुळे शक्य झाल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र अठरावे राज्य
१९०७ मध्ये लाकडाला पर्याय म्हणून प्लॅस्टिक आले, मात्र त्याचा वापर वाढल्याने आज ही स्थिती ओढवली आहे. त्यामुळेच कायदा करण्याची वेळ आली. महाराष्ट्र प्लॅस्टिकबंदी करणारे अठरावे राज्य ठरले. मात्र केवळ कायदा करून चालणार नाही. याच्या अंमलबजावणीवर याचे यश अवलंबून आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.





























































