चंद्रपूरात छाप्यात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपूर शहरातील जूनोना रोड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात 3 बंदुकी, 5 तलवारी, भाला, 3 चाकू आणि सत्तुरसह 12 हजारांची गर्द पावडर जप्त करण्यात आली. या प्रकरणातला मुख्य आरोपी फरार असून इतर 3 आरोपी महिलांना अटक करण्यात आली आहे. हत्यारांचा हा साठा कशासाठी ठेवण्यात आला होता, याचा पोलीस तपास करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात घातक शस्त्रे आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राबविली जात असताना पोलीस पथकाला एका सराईत गुन्हेगाराच्या घरी अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शहर सीमेवरील जुनोना चौकात एक धाडसत्र राबविण्यात आले. सोनूसिंग टांक या गुन्हेगाराच्या घरी 25 ग्रॅम गर्द आढळून आले. याशिवाय घराच्या झडतीत 3 बंदुकी, 5 तलवारी, भाला, 3 चाकू आणि सत्तुरसह काडतुसे जप्त करण्यात आली. घरात 3 महिला हा व्यवसाय करत असल्याचे स्पष्ट झाले. यातील मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान शस्त्रांचा हा साठा नेमका कशासाठी ठेवण्यात आला होता याचा तपास पोलीस करत आहेत. टांक परीवार वन्यजीव तस्करीत सहभागी असल्याचे यापूर्वी निष्पन्न झाले होते.