वेब न्यूज – चीनच्या इंजिनीअर्सची कमाल

>> स्पायडरमॅन

चीनच्या इंजिनीअर्सनी नुकतीच एक 7600 टन वजनाची इमारत एका ठिकाणाहून उचलून दुसऱया ठिकाणी स्थापित करून दाखवण्याचा विक्रम नोंदवला आहे. 1935 मध्ये बनलेली ही शांघायमधली ‘लागेना प्राथमिक विद्यालया’ची पाच मजली इमारत नुकतीच यशस्वीपणे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी हलवण्यात आली. जवळपास 62 मीटर अंतरावर ती दूर सरकवण्यात आली. या इमारतीच्या जवळच बांधकामाचे एक नवे प्रोजेक्ट सुरू होत आहे, त्याला जागा कमी पडू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीदेखील चायनाच्या इंजिनीअर्सनी 2017 सालामध्ये 135 वर्षे जुने असलेले दोन हजार टन जड वजनाचे बौद्ध मंदिर त्याच्या मूळ जागेपासून 30 मीटर सरकवले होते. यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी मात्र शाळेची इमारत सरकवताना चीनच्या इंजिनीअर्सनी तब्बल 198 रोबोटिक अर्थात यांत्रिक पायांचा वापर करून 18 दिवसांत ही बिल्डिंग हलवण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. ही बिल्डिंग पाडूनच टाकण्याचा पर्यायदेखील विचारात घेण्यात आला होता. मात्र इंजिनीअर्सनी आव्हान स्वीकारत ही बिल्डिंग हलवण्याचा निर्णय घेतला. स्थानिक प्रशासनाने आता ही अनोखी इमारत संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यादृष्टीने या इमारतीच्या डागडुजीचे कार्यदेखील हाती घेण्यात आले आहे. जगभरात काही मोजक्या देशांत अशा प्रकारे एखादी इमारत तिच्या मूळ जागेपासून थोडय़ा दूर अंतरावर हलवण्याचे प्रयोग यशस्वी करून दाखवण्यात आले आहेत. मात्र त्या त्या वेळी मोठमोठे प्लॅटफॉर्म्स वापरून आणि प्रचंड आकाराच्या क्रेन्सचा वापर करून हे प्रयोग राबवण्यात आले होते. यावेळी मात्र आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत इमारतीलाच यांत्रिक पाय जोडण्याचा पर्याय निवडला गेला. याआधीदेखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या संक्रमण काळात चीनच्या इंजिनीअर्सनी वुहान शहरात बांधकामाच्या क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करत अवघ्या दहा दिवसांत हजार बेड्सचे हॉस्पिटल उभे करून दाखवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या