अंधेरी पूल दुर्घटना : पश्चिम रेल्वे मध्यरात्रीपर्यंत सुरळीत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
3 जुलै अंधेरी रेल्वेमार्गावरील पूल कोसळला

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांसाठी मंगळवारची सकाळ संकट घेऊनच उगवली. मुसळधार पाऊस आणि पश्चिम रेल्वेवर अंधेरी येथील पुलाचा कोसळलेला भाग याने मुंबईकरांचा वेग मंदावला आहे. पर्यायी मार्ग शोधताना आणि त्यातून वाट काढताना नागरिकांची त्रेधा उडाली आहे. या सगळ्यात बचाव यंत्रणा कामाला लागल्या असून भर पावसात पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. पश्चिम रेल्वेची सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली असली तरी ती मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत सुरळीत होईल, असं पश्चिम रेल्वेचं म्हणणं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रेल्वेने ही माहिती दिली आहे.

अंधेरी-विलेपार्ले दरम्यानची हार्बर रेल्वेसेवा मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत सुरू होईल. तर पश्चिम रेल्वेवरील जलद गती मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होईल. मात्र, पश्चिम रेल्वेची धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक सुरू होण्यासाठी मध्यरात्रीपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.