व्हॉटस्ऍपवरील खोटय़ा बातम्या, अफवांना आळा बसणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात गेल्या काही महिन्यांपासून खोट्या बातम्या आणि अफवांमुळे जमावाकडून होत असलेल्या हत्यांची गंभीर घेत या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सऍप ‘सस्पिशिअस लिंक डिटेक्शन’ हे फिचर लवकरच आणणार आहे. त्यामुळे खोट्या बातम्यांची लिंक आणि आक्षेपार्ह संकेतस्थळांपासून दूर राहणे शक्य होईल. सध्या याची चाचणी सुरू असून लवकरच हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देशभरात गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सऍपवरून पाठवलेल्या काही खोट्या बातम्या आणि अफवांमुळे जमावाने निरपराध लोकांची हत्या केल्या आहेत. त्याबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सऍपला कारवाईचा इशारा दिला होता. त्याची तात्काळ दखल घेत व्हॉट्सऍप हिंदुस्थानी ग्राहकांसाठी हे फिचर उपलब्ध करून देणार आहे. या फिचरमुळे ग्राहकांची फसवणूक मोट्या प्रमाणात थांबेल, असा दावा व्हॉट्सऍपने केला आहे.

फिचरचे काम असे चालेल

सस्पिशिअस लिंक डिटेक्शन फिचर सुरू झाल्यानंतर जर कोणाकडून तुम्हाला खोट्या बातम्यांचे किंवा संकेतस्थळांचे लिंक आली तर त्या लिंकवर क्लिक केल्यावर व्हॉट्सऍप प्रथम त्याचा एक प्रिव्हय़ू दाखवेल. जर लिंक खरोखच खोटी किंवा आक्षेपार्ह असली तर लिंकवर लाल रंगाने ‘सस्पिशिअस लिंक’ असे लिहिलेले शब्द दिसतील. त्यानंतरही एखाद्या ग्राहकाने ती लिंक उघडली तर त्यावर ‘या लिंकमधील शब्द हे फसवे असून लिंक उघडल्यानंतर दुसऱ्याच संकेतस्थळावर जाण्याचा धोका आहे,’ असे इशारा देणारे वाक्य दिसेल.