
व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांसाठी खूशखबर आहे. व्हॉट्सअॅप यूजरना आता व्हॉट्सअॅपनेही पैसे पाठवता येणार आहेत. त्यामुळे आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) गुरुवारी व्हॉट्सअॅप युपीआय पेमेंटला मंजुरी दिली आहे. सुमारे तीन वर्षांपासून व्हॉट्स्अॅपला या मंजुरीची प्रतीक्षा होती.
आता एनपीसीआयची मंजुरी मिळाल्यानंतर व्हॉट्सअॅपने ही सेवा हिंदुस्थानातही सुरू केली आहे. याची चाचणी आणि तपासणीही करण्यात आली आहे. हिंदुस्थानात व्हॉट्सअॅपद्वारे पैसे पाठवण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यूजर आता व्हॉट्सअॅपने पैसे पाठवू शकणार आहेत, असे फेसबुक इंडियाचे प्रमुख अजीत मोहन यांनी सांगितले. हिंदुस्थानातही ही सेवा सुरू झाल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.
देशात व्हॉट्सअॅप पेमेंट 10 स्थानिक भाषांमध्ये वापरता येणार आहे. तुमच्या मोबाओईलच्या व्हॉट्सअॅपमध्ये पेमेंट हा पर्याय दिसत असेल तर तुम्ही तो वापरू शकतात. हा पर्याय दिसत नसल्यास व्हॉट्सअॅप अपडेट करून पमेंट ऑप्शन निवडता येते. ही सुविधा वापरण्यासाठी यूजरकडे डेबिट कार्ड असणे गरजेचे आहे. डेबिट कार्ड व्हॉट्सअॅप पेमेंटला सपोर्ट करते.
व्हॉट्सअॅप पेमेंट ऑप्शनमध्ये बँक निवडून आणि त्यातील माहिती भरल्यानंतर ही सुविधा अॅक्टिव्हेट करता येते. एकमेकांना संदेश पाठवण्याएवढीच आता एकमेकांना पैसे पाठवणेही सोपे झाल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. ही युपीआयवर आधारित सुविधा आहे. त्यात डेटा लोकलायजेशनची काळजी घेण्यात आली आहे.
या सुविधेसाठी व्हॉट्सअॅपने पाच बँकांशी करार केला आहे. त्यात आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक,अॅक्सिस बँक,एसबीआय आणि जिओ पेमेंट बँक यांचा समावेश आहे. या सुविधेद्वारे व्हॉट्सअॅप यूजरसह कोणत्याही युपीआय यूजरला पैसे पाठवता येणार आहेत. यावरून पैसे पाठवणे सोपे आणि सुरक्षित असणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी युपीआय पिन लागणार आहे. ही सुविधा अंड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही वापरवर्त्यांसाठी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.





















































