मध्य रेल्वेच्या टीसींना बॉडी कॅमेरे कधी मिळणार? मारहाणीच्या घटना वाढल्याने तिकीट तपासनीस चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वकडून फुकटय़ा प्रवाशांना चाप लावण्यासाठी तिकीट तपासनीसांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात तापसणी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे फुकटय़ा प्रवाशांवर जरब बसत असली तरी अनेक प्रवासी टीसींबरोबर हुज्जत घालत असून मारहाण करत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर समोरील प्रवाशाच्या हालचाली सहजपणे रेकॉर्ड करता याव्यात म्हणून मध्य रेल्वेने टीसींना बॉडी कॅमेरे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जवळपास एक हजार टीसींना बॉडी कॅमेऱयांची प्रतीक्षा असून ते कधी मिळणार, असा सवाल केला जात आहे.

विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय, मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये नियमितपणे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. मध्य रेल्वेच्या या कारवाईत अनेकदा प्रवाशांकडून टीसीला मारहाणीच्या घटना घडल्या आहे.

कारवाईदरम्यान प्रवासी टीसीशी वाद घालण्याचे प्रकार घडतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासनीसाकडे कर्तव्यावर असताना खिशावर लावण्यासाठी बॉडी कॅमेरा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने मे महिन्यात घेतला असून मुंबई विभागातील 50 टीसींना सदर कॅमेरे देण्यात आले होते. उर्वरित कॅमेरे जुलै महिन्यापर्यंत देण्यात येणार होते, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून उर्वरित टीसींना कॅमेरे मिळालेले नाहीत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे 1200 टीसी कार्यरत आहेत, मात्र त्यांना अद्याप कॅमेरे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात देण्यात आलेल्या टीसींच्या बॉडी कॅमेऱयात काही त्रुटी जाणवल्या असून त्याचा अभ्यास सुरू असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयाने सांगितले.