हुतात्मा स्मारक टपाल तिकीट कधी प्रकाशित होणार, संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात 107 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागातूनच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर 1961 रोजी उभारण्यात आलेले हुतात्मा स्मारक महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट प्रकाशित करावे म्हणून गेल्या 25 वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष महादेव  गोविंद उर्फ भाऊ सावंत पाठपुरावा करत आहेत. तरीही केंद्र सरकारने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे हुतात्मा स्मारक टपाल तिकीट कधी प्रकाशित होणार असा सवाल भाऊ सावंत यांनी केला आहे.

हुतात्मा स्मारक संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा इतिहास जागविणारे प्रतिक आहे. या ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट प्रकाशित करावे म्हणून संयुक्त महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत आडीच दशकापासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. त्याची दखल घेत 18 मार्च 2004 रोजी राज्य शासनाने त्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाला पाठवला आहे. मात्र त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने भाऊ सावंत यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी भाऊ सावंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हुतात्मा स्मारक टपाल तिकिटाच्या प्रलंबित  प्रश्नाबाबत निवेदन दिले आहे. मात्र अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही ही खेदाची बाब असल्याची भावना भाऊ सावंत यांनी व्यक्त केली आहे.

संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास देशभरात पोहोचेल

केंद्र सरकारने हुतात्मा स्मारक टपाल तिकिटाचे प्रकाशन केल्यास ते देशभरातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा इतिहास देशभर पोहचण्यास मदत होणार आहे.  हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट प्रकाशित होणे आवश्यक आहे.