
जगाला मागील जवळपास दोन वर्षे वेठीस धरणारा कोरोना हा भयानक आजार संपला या भ्रमात राहू नका. कोरोनाचे विषाणू अजूनही जगभरात उत्पात माजवू शकतात. त्याला हलके घेऊ नका, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) 53 देशांतील नागरिकांना दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय कार्यालय प्रमुख डॉ. हैन्स क्लूज यांनी युरोप आणि मध्य आशियातील देशांना वरील इशारा दिला आहे. जगातील काही भागांत कोरोनाचा प्रसार पुन्हा होताना दिसत आहे. अशाच वेगाने कोरोनाचा प्रसार वाढला तर जगातील 5 लाख नागरिकांचा फेब्रुवारीपर्यंत बळी जाऊ शकतो, असा अलर्ट डॉ. क्लूज यांनी दिला आहे.
जग कोरोनाच्या बाबतीत गंभीर वळणावर उभे आहे
डेन्मार्कच्या कोपेनहेगेन येथील युरोप मुख्यालयात या विषाणूच्या वाढत्या प्रसाराबाबत डॉ. क्लूज यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, समस्त जग कोरोनाने काही भागात पुन्हा डोके वर काढल्याने एका गंभीर वळणावर उभे आहे. युरोप पुन्हा वर्षभरापूर्वीच्या स्थितीत आले आहे. जगात लसीकरणाचा मंद वेग आणि या मोहिमेत येणाऱया अडचणींमुळे कोरोनाचा पुन्हा प्रसार होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर्स आणि सामाजिक दुरी असे उपाय आणखी काही काळ अमलात आणायलाच हवेत, असेही डॉ. क्लूज यांनी स्पष्ट केले.



























































