
सामना ऑनलाईन। लखनौ
पत्नीने पिण्यास पाणी दिले नाही याचा राग आल्याने मंगळवारी एका नराधमाने दारुच्या नशेत स्वतःच्या आठ महिन्याच्या चिमुरड्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची भयंकर घटना लखनौ य़ेथे घडली आहे. सुरेंद्र बडे असे आरोपी पित्याचे नाव असून पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. कमलेश असे मृत बालकाचे नाव आहे.
सुरेंद्रला दारुचे व्यसन होते. यावरून त्याचा पत्नीबरोबर रोज वाद व्हायचा. मंगळवारीही याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सुरेंद्रने पत्नीला पाणी आणण्यास सांगितले. पण तिने दुर्लक्ष केले. याचा सुरेंद्रला राग आला व त्याने जवळच झोपलेल्या कमलेशला उचलले व जमिनीवर आपटले. यात कमलेशचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी पत्नीने सुरेंद्र विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याने गुन्हा कबूल केला व दारुच्या नशेत हे कृत्य आपल्या हातून झाल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान सुरेंद्रचे कमलेशवर प्रेम होते. काम आटोपून तो रोज कमलेश बरोबर वेळ घालवण्यासाठी लवकर घरी यायचा. पण त्याच्या रागाने घात केला.






















































