
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची कश्मीरमधून बदली करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभिनंदन यांची ‘वीरचक्र’ या शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. अभिनंदन सध्या श्रीनगरमधील हवाई तळावर कार्यरत होते. आता त्यांची बदली पश्चिम विभागात पाकिस्तान सीमेलगतल्या महत्त्वाच्या हवाई तळावर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून बदला घेतला होता. त्यानंतर बिथरलेल्या पाकडय़ांनी हिंदुस्थानच्या लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हिंदुस्थानने पाकचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडून त्यांचा प्रयत्न उधळून लावला होता. या धाडसी कारवाईत अभिनंदन वर्धमान हे पाकडय़ांच्या तावडीत सापडले होते, परंतु हिंदुस्थानच्या दबावामुळे अभिनंदन यांना सुरक्षित हिंदुस्थानच्या हवाली करण्यात आले.
























































