
सामना ऑनलाईन। बंगळुरू
बंगळुरू येथील एका महिलेने उबेर चालकावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. महिला शनिवारी रात्री उबेरमधून प्रवास करत होती. त्यावेळी रस्त्यावर अचानक टॅक्सी थांबवत त्याने तिला टॅक्सीतून उतरण्यास सांगितले तसेच न उतरल्यास तुझे कपडे फाडून टाकीन अशी धमकीही त्याने तिला दिली, असे महिलेने टि्वटमध्ये म्हटले आहे. या तक्रारीनंतर उबेरने चालकाला कामावरून कमी केले आहे.
महिला शनिवारी कामानिमित्त बाहेर गेली होती. मात्र तिला परतण्यास उशीर झाल्याने तिने उबेरने जाण्याचा निर्णय घेतला. पण प्रवासादरम्यान अचानक चालकाने तिला चांगल्या महिलांनी सातच्या आत घरी जायला हवे असा सल्ला दिला. त्याचबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर मद्य न पिण्यासही त्याने तिला सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने आपण मद्यपान केलेली नाही असे सांगत त्याला गाडी चालवण्यास सांगितले. यावर चिडलेल्या चालकाने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर मध्येच गाडी थांबवत तिला खाली उतर नाहीतर तुझे कपडेच फाडेन अशी धमकी दिली. यादरम्यान महिलेने मदतीसाठी उबेरचे सेफ्टी बटन दाबले. पण समोरील व्यक्तीने तिच्याशी न बोलता चालकाला फोन केला. नंतर चालकाने महिलेला टॅक्सीतून खाली उतरण्यास सांगितले. पण उबेरने तिच्यासाठी दुसरी टॅक्सी पाठवली नाही. यामुळे मध्यरात्री महिला रस्त्यावर एकटीच फिरत होती.

























































