शासनाच्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अंधेरीच्या महिंद्रा कोटक बँकेत गेली असता बँक कर्मचाऱ्याकडून एका महिलेची एक हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेची तक्रार येताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बँकेवर धडक देत संबंधित महिलेला न्याय मिळवून दिला.
शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळविण्यासाठी जोगेश्वरी पूर्व विभागातील सिद्धी तळेकर या अंधेरी पूर्व विभागात शेर ए पंजाब कॉलनीमधील असलेल्या कोटक महिंद्रा बँकेमध्ये गेली होती. त्यांच्या झीरो बॅलन्स खात्याबाबत चौकशी करण्यासाठी व पासबुक किवा स्टेटमेंट मागणी केली असता तेथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना 1000 रुपये खात्यात जमा करा मग पासबुक मिळेल असे सांगितले. त्यामुळे सिद्धी तळेकर यांनी 1000 रुपये खात्यात भरले; परंतु सदर रक्कम त्या कर्मचाऱ्याने इन्शुरन्स पॉलिसीमध्ये फिरवली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेना शाखेशी संपर्क साधला. याची दखल घेत माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर व मंदार मोरे शाखाप्रमुख व सहकाऱ्यांसह बँकेत जाऊन याबाबत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यानंतर बाळा नर यांनी बँक व्यवस्थापनाला शिवसेनेच्या भाषेत जाब विचारताच त्वरित पॉलिसी रद्द करून 1000 रुपये परत करण्याचे मान्य केले.
शिवसेनेमुळे न्याय मिळाल्याबद्दल तळेकर कुटुंबाने शिवसेनेचे आभार मानले. या घटनेमुळे महिलांनी या योजनेचा लाभ घेताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन शिवसेनेने केले आहे. यावेळी शाखाप्रमुख मंदार मोरे, आखाडे, शिंदे, शिरीष चव्हाण, किशोर तळेकर उपस्थित होते.