
सामना प्रतिनिधी । नगर
नगरच्या जिल्हा न्यायालयात जागतिक महिला दिन अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. न्यायालयातील महिला न्यायधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांनी महिलांवरील अन्याय अत्याचाराला मूठमाती देत तो झुगारून कसा लावायचा यावर आधारित ‘बोलती बंद’ ही लघुनाटिका सादर करीत खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा जागर केला.
प्रधान जिल्हा न्यायधीश कमलाकर कोठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या नाटिकेची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन दिवाणी न्यायधीश सौ. टी. एम. देशमुख-नाईक यांनी केले होते, त्यांना दिग्दर्शनात अॅड. शिवाजी कराळे यांनी सहाय्य केले. या लघुनाटिकेत अॅड. वृषाली तांदळे, अॅड. अनिता दिघे, सरकारी वकील मनीषा शिंदे, अॅड. रिजवाना शेख, अॅड. उमा कुलकर्णी, अॅड. पल्लवी बारटक्के, अॅड. स्वाती पाटील, अॅड. निरुपमा काकडे, न्यायालयीन कर्मचारी स्नेहल पवार, यांनी भूमिका केल्या.न्यायालयीन कर्मचारी पियुष उपाध्ये यांनी ढोलकी वादन केले तर रतन येणारे यांनी ध्वनी संकलनाची जबाबदारी पार पाडली.
या लघुनाटिकेत कौटुंबिक हिंसाचार, बाल लैंगिक शोषण, मुलींची छेडछाड, कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे शोषण या विषयांबाबत विविध प्रसंगांमधून जनजागृती करण्यात आली. महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. तसेच या विषयांना प्रतिबंध घालण्यासाठी असलेल्या कायद्यांची मदत कशी करायची याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
यावेळी जिल्हा न्यायाधिश न्या. व्ही. व्ही. बांबर्डे, न्या. श्रीमती एम. व्ही. देशपांडे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. पद्माकर केस्तीकर, नगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.शेखर दरंदले, सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष जे.बी. भापकर, न्या. श्रीमती पी.पी.बनकर, न्या. श्रीमती के.के. पाटील, न्या. श्रीमती एस.एस.पाटील, न्या. श्रीमती बी.एस.गारे, न्या. श्रीमती आर. पी.परदेशी, न्या. श्रीमती के.व्ही. बोरा, न्या. श्रीमती व्ही.सी. देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात न्यायधीश सौ. टी. एम. देशमुख-नाईक म्हणाल्या स्रियांनी आता जुनी कात टाकून शिक्षणाच्या जोरावर नवीन उभारी घेतली आहे. त्यामुळे स्रीच्या विचारांची झेप ही उंचावत आहे. घरापासून दारापर्यंत ती स्री दुसऱ्या स्त्रीच्या दुःखाचे कारण नसून आधार बनली आहे. पुरुषा बरोबर स्त्रीने ही विविध क्षेत्रात कामाच्या माध्यमातून आपला ठसा उमटविला आहे.ही महती सांगणारा नारी शक्तीचा जागर या निमित्ताने सादर केला असून प्रत्येकाने कायद्याचे पालन करून चांगला समाज निर्माण करण्याचे काम करावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन न्या.श्रीमती एस.पी. केस्तीकर-नलगे यांनी केले तर न्या. श्रीमती आर.आर. देशपांडे यांनी आभार मानले.






























































