मुंबई पोलीस बोलतोय सांगत महिलेला तब्बल 80 लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या लढवताना दिसतात. अशीच एक घटना पंजाबमधील चंदीगड शहरात उघडकीस आली आहे. सायबर आरोपीने अतिशय चलाखीने महिलेकडील 80 लाख रुपये काढून घेतले आहेत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

चंदीगडमधील एका महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे महिलेला सांगितले. यानंतर तुमच्या आधार कार्डद्वारे एक सिम कार्ड इश्यू करण्यात आले आहे. या सिम कार्डचा वापर मनी लाँड्रिंगसाठी करण्यात आल्याचेही आरोपीने महिलेला सांगितले.

याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करत तुम्हाला अटक करू, अशी धमकीही आरोपीने महिलेला दिली. यानंतर महिला घाबरली. याचा फायदा घेत आरोपीने आपला डाव साधला. व्हेरिफिकेशनच्या नावाखाली महिलेकडे 80 लाख रुपयांची मागणी केली. तसेच व्हेरिफिकेशनध्ये निर्दोष सिद्ध झाल्यास हे 80 लाख रूपये परत करू, असे आश्वासनही महिलेला दिले.

यानंतर घाबरलेल्या महिलेने तात्काळ आपल्या खात्यातील 80 लाख रुपये आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर काही वेळातच आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने पोलिसात धाव घेत सर्व घडला प्रकार कथन केला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.