अरे देवा! लग्नासाठी तरुणीने केले तरुणाचे अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नासाठी तरुणीने सुपारी देऊन तरुणाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मात्र, पोलिसांनी अवघ्या चार तासांत अपहरण नाट्याचा पर्दाफाश करीत ७ जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. नीलेश लक्ष्मण बोद्रे (वय २९, रा. शिंदेवाडी, ता. हवेली) असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सुदाम माणिक ताठे (रा. वजूर, जि. परभणी), शेख सोहेल शेख अफसर (रा. वालूर, जि. परभणी), देवीदास भगवान पांजगे (रा. परभणी), वैभव मिलिंद शेळके (रा. परभणी), सारंग भगवानराव काकडे (रा. आष्टूर, जि. नांदेड), प्रसाद बंडू गवळी (रा. परभणी), सोनाली बालाजी निर्वाळ (रा. परभणी) यांना अटक केले आहे.

पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता अजय लक्ष्मण बोद्रे यांनी फोन करून त्यांच्या भावाचे एच. पी. पेट्रोल पंपाजवळून कारमधून अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी तत्काळ तपास पथके रवाना केली. प्राथमिक तपासात नीलेश लक्ष्मण बोद्रे (वय २९) यांना आरोपींनी मारहाण करून अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धाव घेतली. तपासासाठी लोणीकंद पोलीस आणि गुन्हे शाखेची पाच स्वतंत्र पथके तयार केली.

बीड, नांदेड, परभणी पोलिसांच्या मदतीने आरोपींना माजलगाव (बीड) याठिकाणी ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपी सोनाली बालाजी निर्वाळ (वय २७, रा. भाग्यनगर, परभणी) हिने नीलेश बोद्रे यांच्याशी जबरदस्तीने विवाह करण्याच्या उद्देशाने आरोपींसोबत संगनमत करून अपहरण केल्याचे उघड झाले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त गौहर हसन, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, एलसीबी बीडचे शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर, एपीआय विजया वंजारी, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, तुकाराम सुरवसे, मकाने, स्वप्नील जाधव, कैलास साळुंखे, सागर जगताप, रितेश काळे, संतोष अंदुरे, मल्लारी सपुरे, शुभम चिंनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड, अशोक शेळके, तुषार पवार, प्रियांका पानसरे यांनी केली.