
अनैतिक संबंधातून महिलेवर देहविक्री करण्यासाठी दबाव टाकणाऱ्याचा महिलेने साथीदारांच्या मदतीने खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये महिलेसह तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
चाकूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या आष्टा मोहदळ येथे 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता एका पुरुषाचा मृतदेह सापडला होता. याची माहिती मिळताच चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर तपासासाठी एक पथक नेमण्यात आले.
पोलीस तपासामध्ये सदर मृतदेह हा चाकूर येथील हनुमंत व्यंकट येवरे (वय – 40) यांचा असल्याचा स्पष्ट झाला. हनुमंत यांचे एका महिलेची अनैतिक संबंध होते. सदर महिला आपल्या पतीपासून विभग्त रहात होती. हनुमंत हा सदर महिलेवर देहविक्रीसाठी दबाव टाकत होता आणि मारहाण करत होता. या जाचाला कंटाळून सदर महिलेने त्याला ठार मारण्याचा कट रचला. 12 डिसेंबर रोजी हनुमंत याला सदर महिलेने एका निर्जन स्थळी बोलावले आणि साथीदारांच्या मदतीने लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला.
पोलिसांनी खुनाच्या आरोपात संतोष धोंडीराम घाडगे (वय – 25, रा. शिवनखेड ता. चाकूर ), लक्ष्मण बब्रुवान डांगे (वय – 38, रा. आष्टा ता. चाकूर) आणि महिलेला अटक केली. खुनाच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदर महिलेच्या सांगण्यावरून हनुमंत यांना रॉडने डोक्यात मारून खून केल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 302, 201, 34, 120(ब) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
































































