
पतीच्या मृत्यूचा विरह सहन होत नसल्याने स्वतःच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केल्यानंतर आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कराडच्या रुक्मिणीनगर परिसरात घडली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
हर्ष (वय 8) आणि आदर्श (वय 6) अशी मृत मुलांची नावे आहेत. तर, अनुष्का सुजित आवटे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे.
अनुष्का यांचे पती सुजित यांचा सुमारे सहा महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूचा विरह सहन होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे अनुष्काने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनुष्का यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांनी भेट दिली.



























































